Thursday, February 28, 2019

अदलाबदल

गुरुवारमाघ कृष्ण सप्तमी,पहाटे ३ वाजून १४ मिनिटे
लाँच व्यवस्थित झाला आणि उपग्रह ठरवून दिलेल्या कक्षेत आपल्या कामाला लागला. कंट्रोल रूम ला पहिला सिग्नल आला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. आठवड्याचा ताण एकदम हलका झाला. इस्रो आणि खासकरून डॉ किरण यांचं कौतुक  करणारे मेसेजेस जगभरातून येत होते. एखाद्या नव्यानेच टीम मध्ये आलेल्या फलंदाजाने सर्वात पहिल्या बॉल वर सिक्स मारावा त्याप्रमाणे डॉ किरण यांनी इस्रो मध्ये आल्या आल्या तीन महिन्याच्या आत एक भला मोठा उपग्रह अतिशय किचकट अश्या कक्षेत सफाईदार पणे नेऊन पोचवला होता.
आता दुसरी टीम म्हणजे,  उपग्रह वरती घेऊन जाणारे सगळे वाहक सुखरूप परत पृथ्विवर आणणारी कामाला लागली. भारताला जग फार काटकसर करणारं राष्ट्र म्हणून ओळखतं. आणखी एक काळजी म्हणजे अंतराळात कचरा तयार करायचा नाही.
उपग्रहाला कक्षेत सोडणाऱ्या वाहकाचा परतीचा प्रवास सुरू झाला.  वाहक परत आणण्याची जबाबदारी असलेले काही तंत्रज्ञ आणि उपग्रहाचे निरीक्षण करणारे ठराविक लोक सोडले तर कंट्रोल रूम मधले बहुतेक सगळ्यांची आठवड्याची सुट्टी आता सुरू होणार होती आणि डॉ किरण ला तर चांगली सहा आठवड्याची घसघशीत सुट्टी.
सगळेच मस्त मुड मध्ये होतेतेवढ्यात "आपण आपला उपग्रह फारच उंचावर नेलाय नाइतक्या वरतून काही दिसेल त्याला?" रवी च्या या प्रश्नावर सगळेच खळखळून  हसले. सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत होते असं ही नाही. पण हसायचं कारण म्हणजे प्रश्न रवी ने  विचारला होता. सगळ्यांचा समज असा कीकोणाची स्पर्धा नको म्हणून हे पाऊल उचललं होतं.  शिवाय दुसऱ्या देशाच्या उपग्रहाला कधीही उपग्रहाच्या जीवन कालावधीत नुकसान किंवा धडक तर होणार नाही ना म्हणून घेतलेली खबरदारी. खरं कारण काय होतं हे फार कमी लोकांना माहिती होतं.
रवी चहा देण्याचं काम आणि इतर छोटी मोठी कामं करतो. सर्वांना चहा माणसानेच द्यायला हवा होता. यंत्र मानवाच्या हाताला चव नाही असं म्हणणं सगळ्यांच मत पडलं.  रविच चहा बनवतो आणि देतोनंतर फावल्या वेळात काहीना काहीतरी ऑनलाईन कोर्सेस करत राहतो.
बाकीची सगळी श्रमाची कामं आणि साधारण कामं करायला यंत्र मानव आहेत. डॉ रमण यांनी त्याला आणि इतर सगळ्या कनिष्ठ कर्मचारी वर्गाला मागे लागून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यास भाग पाडलं. डॉ रमण आहेतच असे लाघवी. सर्वांची काळजी घेतात सर्वांनी शिकत राहावं आणि शैक्षणिकव्यावसायिक प्रगती करत राहावी म्हणून ते सतत प्रयत्नशील असतात.
डॉ रमण चेअरमन आणि मुख्य शास्त्रज्ञयांच्या मार्गदर्शनात गेली ६ वर्ष  इस्रो आणि भारत फार वेगवेगळे प्रयोग करतोय. त्यांनी अनेकदा जगाला सुखद धक्के दिलेत. मागच्या भाद्रपद मधे या रोकेटमॅन च्या मार्गदर्शनाखाली भारताने एक रॉकेट शोध याना बरोबर धूमकेतू च्या मागावर पाठवले आहे आणि हे शोध यान धूमकेतू वरच चिकटून बसणार आहे. वाटेत ते ठराविक अंतरावर आपल्या पृथ्वीशी संपर्क करता यावा म्हणून रीसेप्टर सोडत जाणार आहे. हे रीसेप्टर स्वतः आपली जागा पृथ्वी आणि धूमकेतूच्या मध्ये संवाद चालू रहावा म्हणून अडजस्ट करत राहणार आहेत. हा धूमकेतू आपल्याच आकाशगंगेत आणि ते सुद्धा आपल्या जवळच्या ग्रहमालांमधे फिरत राहणार असल्याने जगभरातल्या शास्त्रज्ञांनी फारशी टीका ही केली नाही. बरं धूमकेतू वरच्या यानातून येणारे संदेश ही रीसेप्टर मुळे निम्म्याहून कमी वेळेत येणार आहेत. सगळ्याच जागतिक शास्त्रज्ञांना उत्सुकता आहेत्यांनी मांडलेले सिद्धांत आणि प्रमेय किती आणि कसे काम करताहेत. एकदा शोधयान धूमकेतू वर उतरलं की भरघोस मदतीचा ओघ इस्रो कडे येणार हे नक्की.
रवी किरण सरांना चहा द्यायला त्यांच्या कबिन मध्ये गेलातेंव्हा ते बाहेर जायच्या तयारीत होते.  पण रवी ने बनवलेल्या चहाला कोण नाही म्हणू शकेल. सरांचं भरभरून अभिनंदन करता करता रवी म्हणाला "आज रमण सर हवे होते...". किरण सर त्यावर काहीच बोलले नाहीत.
पहाटे ६ वाजून २५ मिनिटे
रवी डॉ रमण यांचा स्पेशल चहा घेऊन हॉस्पिटल मध्ये पोहोचला. डॉ किरण रमण सरांबरोबर बोलत बसले होते.  रमण सरांच्या डोळ्यात आनंद मावत नव्हता. रवी आला तसे किरण सर जायला निघाले.
" तुम्ही खूप चांगली पार पाडलित ही मोठी जबाबदारी"या रमणसरांच्या प्रशंसे वर डॉ किरण जे म्हणाले ते ऐकून रवी एकदम चपापला. "काय रमण सरहे सगळ तुमचं यश आहे. तुमची इच्छा असेल तरमीच काय हा रवी सुद्धा लाँच करू शकतो." पुढच्या वाक्याने मात्र ती सावरला, "पण अशी रिस्क परत घेऊ नका प्लिजतब्ब्येतीला जपाआणि आता जास्त वेळ लावू नका. ताबडतोब सगळं पूर्वीसारखं होऊ द्या." डॉ किरण ला जाता जाता रमण सरांनी "ऑल द बेस्ट" विश केलं.
किरण सर गेले तर लगेच ७-८ डॉक्टर लोकांची फौजच आत आली. त्यांनी रवी ला बाहेर जाण्याची खूण केली. रवी ने चहा चा कप आणि नाश्त्याची डिश उचलली आणि सगळं व्यवस्थित पॅकिंग करून बाहेर पडला. त्याने हात हलवून सरांना सांगितलं पण सरांचं लक्ष नव्हतं. सर आत आलेल्या डॉक्टरांना काही सांगायला खूप अधीर झाले होते.
"आता मला घरी जाता येईल कासगळं व्यवस्थित आहे. आणि आधी हे डोक्यालामानेलामणक्याला चिकटवलेले नोडस् काढा बघू. नीट झोपता पण येत नाही यांच्यामुळे. आणि मला चांगली गरम पाण्याने आंघोळ करायची आहेहे स्पंजींग बस झालं आता. मला आता मस्त फिरायच आहे,  देवळात जायचयं आणि मस्त रामेश्वर ला माझ्या गावी जाऊन मस्त समुद्राच्या बरोबर गप्पा मारायच्या आहेत. ऑफीस मध्ये जायचयं आणि स्क्रीन वर का होईना  नव्या उपग्रहाला बघायचाय." दम लागेपर्यंत रमण बोलतच होते.
शेवटी ब्रेन अक्टिविटी मॅपिंग करणाऱ्याने थांबवलं म्हणून नाईलाजाने शांत झाले.  "तुमची अॅक्टिविटी खूप जास्त होते आहेअसेच जास्त एक्साईट झालात तर हे सोडणार नाहीत घरी. खूप नाजूक स्थितीत आहात तुम्ही. मेंदूला कोणत्याही वाईट किंवा असुरक्षित विचारांची लागण होऊ नये म्हणून तुम्हाला इथे आमच्या देखरेखी मध्ये ठेवलय. आणि या प्रयोगाच म्हणाल तर तुम्हीच तो तुमच्या अंगावर ओढवून घेतलाय. आम्ही खूप नको सांगत होतो ."  "पण काही का होईना आमचा प्रयोग यशस्वी झाला आणि तुमचा ही"
यावर सगळेच छान हसले. ताण कमी झाला आणि सरांच्या मेंदूची धोक्याच्या पातळीजवळ पोहोचलेली अॅक्टीविटीही कमी झाली. मेंदू संशोधक डॉ महेश नी खूण केल्याप्रमाणे नर्स ने गुपचूप रमण ना झोपेचं इंजेक्शन दिलं. हळूहळू शांत होत रमण सर झोपले.  सगळ्यांच्या जीवात जीव आला.
संध्याकाळ ७ वाजून २० मिनिटे
सगळे वाहक चांगल्या स्थितीत आहेत आणि पुन्हा पुढच्या लाँच च्या वेळी बिनधास्त वापरता येण्याजोगे होते. ते त्यांच्या स्टेशन वर स्वच्छ करण्यासाठी नेण्यात आले. तंत्रज्ञांनी आपले रिपोर्ट सबमिट केले आणि ते घरी जाण्यासाठी निघाले.
आजचा लाँच फारच सोपा होता काखरचं आता कोणीही हे तंत्र लगेच आत्मसत करू शकतं काया विषयावर चर्चा संपत नव्हती. किरण बद्दल कोणाच्या मनात काही वाईट भावना नव्हती. काहीजण डॉ रमण सरांच्या तब्येतीची काळजीत तर काहींना आता नुकता आलेला किरण आपल्यासारख्या सिनियर ना डावलून आपला बॉस होतो का ही चिंता.
तरुण असला म्हणून काय झालाइंटरनॅशनल एरोनॉटिक्स चा टॉपर होता. किरण ला प्रत्यक्ष लाँच चा अनुभव नसला तरी त्याने सादर केलेले पेपर्स फारच ब्रेक थ्रू स्वरूपाचे होते. नासा ने नेण्यागोदरच रमण सरांनी हिरा भारताजवळ राखून ठेवला होता.
दोन निरीक्षक मागे राहिले बाकी आता सगळे घरी गेले. या दोघांना फारसे काम नसतं कधी. सगळ काही यंत्रमानव करत असतात. नुसत त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आणि अधून मधून २७ स्क्रीन्स वर (९ आडवे ३ उभे) बघायचं. एकदा नजर सरावली की हे काम फारस अवघड वाटत नाही आणि त्यात वेळ जात नाही. उलट या दोघांकडे खूप वेळ मोकळा उरतो. पण झोपाव म्हटल तर यंत्रमानव तसं करू देत नाही. 
रात्रीच्या आकाश कधी मॉनिटर वर कधी थेट बघावं. टेलिस्कोप मधून आकाशात नवीन काही दिसतंय का याचा शोध घ्यावा. यात दोघांची रात्र जायची.
गुरुवारमाघ कृष्ण सप्तमी
संध्याकाळ ७ वाजून २२ मिनिटे
मशिन च्या फॅन्स चा घुंऽऽइंडिकेटर चा बीपप्रिंटर कांऽऽ कुंऽऽ यांचे आवाज आता यांच्या कानावर पोहोचतच नाहीत. पण एकदम एक विचित्र आवाज आला आणि लगोलग नासा ची हॉट लाईन ही वाजायला लागली....
शुक्रवारमाघ कृष्ण अष्टमी,सकाळ १० वाजून १७ मिनिटे
डॉ किरण सकाळीच नव्याउपग्रहाची सद्यस्थिती बघायला आले होते.  एक परिक्रमा  पूर्ण झाली होती सकाळीच. माहिती घेवून त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. आजपासून चार आठवडे त्यांना सक्तीची विश्रांती घ्यायची होती.
"कालच्या रात्रीचा फोन आता थोडे दिवस तरी त्रास देणार". रमण सरांच्या सहाय्यकाला कॅबीन मध्ये बोलावून घेतलं. जवळपास तीन दिवस त्यालाच हा किल्ला लढवायचा होता.
त्या दोघांचं नासा बरोबर झालेलं बोलणं स्टाफ काचेतून बघत होता. दोघं किती शांतपणे पण टेन्शन मध्ये असल्यासारखे बोलत होते. हळू हळू येरझाऱ्या घालत होते. अर्ध्या तासाने फोन ठेवला तेंव्हा दोघेही काही क्षण एकमेकांकडे नुसते बघत राहिले होते. शेवटी दोघेही हसले आणि बाहेर यायला निघाले. काचेतून वाकून बघणारा सगळा स्टाफ आपण त्या गावचेच नाही असं दाखवून कामाला लागला. किरण बाहेर आले आणि त्यांनी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना ५ मिनिटांसाठी एकत्र यायला सांगितलं. झाडून सगळे धावत आले. रवी मिठाई घेऊन हजर होताच. छोटंसं सेलिब्रेशन झालं आणि डॉ किरण नी एकदम मुद्द्याला हात घातला.
"मला हॉस्पिटल मधे राहावं लागेल थोडे दिवस असं सांगितलंय." सगळे अवाक झाले.  काय चाललंय रमण सर आजारी असताना किरण दुसऱ्यांदा हॉस्पिटल मध्ये का दाखल होताहेतमागच्या महिन्यात तर तीन दिवस  हॉस्पिटल मध्ये होते. आणि रमण सर गेले दीड महिने हॉस्पिटल मध्ये आहेत. काय झालय कोणी सांगत नाही. फक्त दोन लोकांना त्यांना भेटण्याची परवानगी आहे आणि ते दोघे ही काही सांगत नाहीत. किरण ला विचारायची सोय नाही आणि आणि रवी रोज भेटतो तरी म्हणतो की काहीच माहीत नाही - सर काही सांगत नाहीत. आता तेवढा मोठा उपग्रह सोडून एक दिवस नाही झाला तर हे चालले परत. तीन दिवसांनी रमण सर येतीलपण ते पूर्ण दिवस काही  थांबणार  नाहीत.
अरे देवापरत एकदा डेझी मॅडम येणार वाटत! आणि यावेळी किती दिवस थांबणार काय माहीत.
डेझी मॅडमगेले १० वर्ष  इंटरनॅशनल व्यावसायिक लाँच सांभाळत आहेत. आणि त्यांनी इस्रो इंटरनॅशनल ला एकदम श्रीमंत संघटन बनवले आहे. आपला दबदबा जगात निर्माण केला आहे. त्या शिस्तीसाठी आणि नियोजनासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच रमण सरांच्या लाघवी स्वभावाची सवय असणाऱ्या लोकांना डेझी मॅडम कदाचित रागीट वाटतात.
"सर एकदम बरे झालेले आहेत ही आपल्या साठी खूप आनंदाची गोष्ट आहे. ते तीन दिवसांनी जॉईन करतील आणि रोज ४-५ तासा करीता लॅब मधे येतील .  डेझी मॅडम १५ दिवस तुमच्या बरोबर असतील. त्या या नवीन उपग्रहावर लक्ष ठेवतील. बाकीचं काम आणि आधीचे प्रोजेक्टस आहेत तसे चालू राहतील. त्यांच्या टीम मध्ये काहीही बदल होणार नाही. सर्वांनी प्लीज आपलं काम नेहमीप्रमाणे चालू ठेवा!"
"आणि नासा मधून हॉटलाईन वर परत कॉल आला तर..." मध्येच कोणीतरी गर्दीतून विचारलं.
"तर त्याची काळजी रवी घेईल" या किरण च्या उत्तरावर सगळ्यांचे डोळे विस्फारले. रवी? "म्हणजे रवीकांत"रमण सरांचे सहाय्यक. सगळ्यांच्या नकळत एका सुरात सगळे हसले.
"पण तुम्ही कधी येणार" या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत किरण स्वतः शी काहीतरी पुटपुटले "आता द्यायची पाळी माझी आहे. " दोन पावले चालले तर लक्षात आलं की  निरोप घ्यायचाच राहिला. पण ओले डोळे बघितले तर चर्चा सुरू होतीलम्हणून त्यांनी मागच्या मागेच बाय म्हणत हात फिरवला. "ऑल द बेस्ट" . त्यावर सगळे म्हणाले "बाय सरगेट वेल सून". पण कोणीच "ऑल द बेस्ट" नाही म्हणालं.
रवी खरंच फार हुशार असावाआणि म्हणून रमण सर त्याच्यावर जास्त मेहनत घेतात. तो स्वतःहून मागे मागे आला आणि "ऑल द बेस्ट" म्हणाला. त्याला काही माहित होतं का?
दुपारी १ वाजून ३० मिनीटे
जेवण झाल्यावरसगळं सामान घेऊन किरण निघाले.  हॉस्पिटलमधे पोहोचायला तासभर तरी लागेल. या तासाभरात काही विचार नको यायला  मनात म्हणून त्यांनी त्यांची आवडती दोन पुस्तकं घेतली. सगळे म्हणतात की किरण आणि रमण सर पुस्तकं नुसती स्कॅन करतातवाचत नाहीत. कितीही स्पीड रीडिंग केले तरी २००-२५० पानांची पुस्तकं कोणी एका तासात कशी वाचू शकेल.
दुपारी २ वाजून ४२ मिनीटे
किरण अगदीच पुस्तकात हरवून गेले असावेत कारण त्यांना हॉस्पिटल पाच मिनिटात असल्यासारखे वाटलं. ते उतरले नाहीत शेवटची दोन पानं संपेपर्यंत. ड्रायवर ला या गोष्टी ची सवय होती.  किरण नी वाचून झालेली पुस्तकं त्याला वाचायला मिळतात. कधी कधी काही आवडलं तर तो वाचत ही असतो.
किरण हॉस्पिटल शिरले आणि पहिल्यांदा रमण सरांना भेटले. आज रमण सरांना डिस्चार्ज मिळाला असता. पण डॉक्टरांच्या पॅनल ला आजही रमण सरांच्या मेंदू मधे ओव्हर अॅक्टिवीटी जाणवली. आता त्यांचा मेंदू जरी त्यांच्या स्वतःच्या पूर्ण कंट्रोल मध्ये आला असला आणि कोणाचंही कसल्याही प्रकारचं 'अतिक्रमणहोणं शक्य नसलं तरी त्यांना तसेच सोडणं धोक्याचं होतं. अजून एक दिवसअजून एक दिवस म्हणत चांगले चार दिवस मुक्काम वाढला होता. लाँच बघायला येणार होते रमण सर पण...
"जर  योगसाधना करणाऱ्या रमण सरांना तेवढा त्रास झालातेवढा वेळ लागला डिस्चार्ज मिळायलातर माझं काय होईल. मी तर कधीच मनाला तेवढा वेळ दिलेला नाही. मेंदूला पौष्टिक असं शीर्षासन तर सोडाचपण मेंदूसाठी पौष्टिक असा आहार पण केलेला नाही." किरण आपल्याच धुंदीत स्वतःशी बोलत चालला होता.  "मी नापास झालो तर..." या विचार आला आणि तो एकदम चपापला. "आयुष्यात मी कधी नापास नाही झालोआत्ता ही व्हायचं नाही मला "मलाही परतफेड करायची आहे. मीही रमण सरांसारखा आदर्श शास्त्रज्ञ होणार." एकदम कोणावर तरी धडक लागून तो भानावर आला. "मला नाही वाटतं की तुम्ही नापास व्हाल" असं कोणीतरी बोलून गेलं. "कोण आहे?". बरेच जण होते आसपास पण त्यांच्यापैकी कोणी बोललं असेल असं वाटलं नाही.
"कोण होतं तेका ते माझं अंतर्मन होतं?" असा विचार करत ते रमण सरांच्या रूम मध्ये पोहोचले. किरण चा गोंधळलेलाकिंचित घाबरलेला चेहरा बघून रमण सरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. किरण चं पहिल्यांदा सरांकडे नीट बघितलं तरआज सरांच्या डोक्यावर चिकटलेले सगळे सेन्सर्स काढलेले होते. सरांना आज कुठल्याही मशिन शी बांधलेले नव्हतं. "हो आता मी मोकळा झालोआज तर आंघोळ पण केली मस्त गरम गरम पाण्याने आणि स्वतः ची स्वतः" रमण सर असं म्हणाले जस काही त्यांना...
"सरांना मनातलं सगळ ऐकू येतंय का आता?" किरण चे विचार चालूच होते. "मी जिवंत परत येईन नामी तर केवढा तरुण आहेमाझ्याकडे किती असा ज्ञान संचय झालायमी असा कितीसा देणारआणि जर मी हे नाही पेलू शकलोआणि अर्ध्यावरच..."
रमण सरांनी परत खांद्यावर हात ठेवला. "मला कळतय की तुझ्या मनात काय चालू आहे. भीतीसंभ्रमअविश्वास आणि बऱ्याच भावना तुझा निर्णय चुकीचा आहे असं तुला सांगताहेत. पण विश्वास ठेव आपल्या देशाच्या तंत्रज्ञानावर. आणि तुला कोणीही बळजबरी करणार नाही. हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल. डॉक्टरांच्या पॅनल बरोबर परत एकदा मीटिंग करूया का?" किरण ला पुन्हा ती दिड महिन्यापूर्वी संध्याकाळी झालेली ती मीटिंग आठवली. ज्यात रमण सरांनी क्षणार्धात जगातला सगळ्यात धाडसी निर्णय घेतला होता.
शनिवारपौष शुद्ध पंचमी,
संध्याकाळ, ७ वाजून ३० मिनीटे,
डॉ रमणडॉ शास्त्रीगजानन गुरुजी२२/७आणि कार्तिक यांचं एक पंचक आहे.  डॉ रमण अंतराळ शास्त्रज्ञडॉ जितेंद्र वसंत शास्त्री अर्थात जीवशास्त्री  जगप्रसिद्ध बायोटेक शास्त्रज्ञ,  २२/७ अथवा पै (pi, π) कॉंप्युटर सायंटिस्ट,  कार्तिक गणितज्ञ आणि गजानन गुरुजी पुरातन शास्त्र तज्ञ. दर तीन महिन्यांनी एका शनिवारी हे एकमेकांना भेटतात आणि रात्रभर गप्पा मारत जागून काढतात.
सगळ्यांचा जन्म एकाच दिवशी एकाच वेळी एकाच गावात झाला. शाळेतून त्यांच्या पालकांना जेव्हा कळलं या योगायोगा बद्दल, तेंव्हापासून त्यांच्या पालकांनी ठरवलं, यांना एकत्र वाढवायचं. पाचही जणाच्या आवडी एकसारख्या पण व्यवसाय मात्र एकदम वेगळे. त्यांच्या पत्नींच्या टोळक्या ला ते आमटिभात ग्रुप म्हणून ते हाक मारतात. त्यांची ही या निमित्ताने भेट होते.
आज रमण सरांनी मुद्दामहून किरण ला ओढून आणलं होतं. काहीतरी शिजत होत बरेच महिने पंचक मध्ये. किरण ला आणण्याच्या नादात रमण सरांना उशीर झाला होता.
शास्त्री बोलत होते "आईंस्टाइन चा मेंदू ज्याने चोरलात्याला वाटलं होतं की या महान शास्त्रज्ञाची बुद्धी आणि ज्ञान मला मिळालं तर? तेंव्हाच खरंतर या विषया चा भुंगा सगळ्यांच्या डोक्यात घुमू लागला. कॉम्पुटर चा बॅक अप आपण जसा घेतोपेन ड्राईव्ह किंवा ब्लू टूथ जसा डाटा ट्रान्स्फर करतोतसा मेंदूचा डाटा म्हणजे ज्ञान एका डोक्यातून दुसऱ्या डोक्यात टाकता येईल काआणि या बुद्धी साठ्याची लायब्ररी करता येईल का?"
पै नी भर घातली, "किरणखूप संशोधन झालं जगभरखूप प्रयोग ही झाले. खूप प्राणी आणि माणसं बळी गेली आत्तापर्यंतखूप ब्रेनडेड ही झाले. नुकसान किती झालं याचं आकडा काही स्पष्ट नाही पण फार वाईट रित्या हे प्रकरण हाताळलं गेलं. " 
"पण ब्रेकथ्रू मिळाला फक्त डॉ शास्त्रींना आणि तोही एकही बळी न जाताएकही अपयश न येता." ४ महिन्यांपूर्वी डॉ शास्त्रींनी भारत सरकारने या प्रयोगाचं महत्त्व ओळखून फेलोशिप दिली. आणखीन गंमत म्हणजे १० वर्ष कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाहीत. महिन्याला ठराविक रक्कम आणि हवी ती टेक्नॉलॉजी हव्या त्या देशातून पुरवली जाईल. "
"डॉ शास्त्रींनी पूर्ण वाढ झालेल्या कावळे आणि पोपट यांच्या ज्ञाना चा एक डाटा बेस बनवला. आणि तरुण कावळेपोपट यांच्या मेंदू मधे हा ज्ञानसंग्रह भरून जगाला हादरवून टाकलं. आत्ता जे हुशार कावळ्याचे  व्हिडिओ फिरताहेत ते शास्त्रींचे कावळे आहेत. किती देशांनी शास्त्रींना स्वतः कडे खेचण्याचा प्रयत्न केला. पण शास्त्री बधले नाहीत."
"बरं ते जाऊ दे" स्वतः ची स्तुती मध्येच थांबवत शास्त्री म्हणाले, "मुख्य जे मला सांगायचे आहे ते बाजूला राहील. नीट ऐका आणि कोणाजवळ ही वाच्यता करू नका." आणि हे बोलता बोलताच शास्त्रींनी पैं नी बनवलेल्या, कुठल्याही इलेक्टरोमॅग्नेटिक रेकॉर्डींग यंत्राला काही काळासाठी उपयोगहीन करणाऱ्या, मशिनला स्विच ऑन केले. पंचक फार जागरूक आहे या बाबतीत.
"सगळे प्रयोग पूर्णपणे यशस्वी झालेतघोड्यावर केलेला प्रयोगही यशस्वी झाला. आता मला एक प्रगत जीव हवाय!" या वाक्यावर मात्र सगळ्यां चा श्वास रोखला गेला. बुद्धीमध्ये घोड्याहून प्रगत जीव म्हणजे अर्थात माणूस...
सगळ्यात पहिले सावरले ते डॉ रमण आणि ते जे बोलले ते ऐकून सगळे आणखीनच अवाक झाले. कार्तिक तर तोल जाऊन खालीच पडले खुर्चीतून.
"नाही"  "हो!" " नाही"  "होऽयऽ! मीच पहिला सब्जेक्ट होणार" च्या चर्चेत उरलेली रात्र गेली. रमण सरांनी मनाची पूर्ण तयारी केली होती. सकाळी पै वहिनींनी बघितलं तर सगळे खुर्चीत पेंगत बसलेले. उठवलं तर वाद पुन्हा सुरू झाला. रमण सर काही ऐकेनात. शास्त्रींनी यावर तोडगा काढला. "मी माझ्या प्राण्यांना पूर्ण तपासून घेतो. जर डार्विन म्हणतो तसा 'फीटेस्ट टू सर्वायव्हीवम्हणजे जगण्यासाठी सर्वश्रेष्ठ असेल तरच त्याच्यावर प्रयोग करतो. तुम्हाला ही तशी परीक्षा द्यावी लागेल"
वातावरण हलकं करण्यात गजानन गुरूजी पटाईत आहेत "महाभारतातबरं काएक वदन्ता आहे म्हणजे गोष्ट आहे. पांडवमधला शेवटचा म्हणजे पाचवा, पांडव सहदेव हा सर्वज्ञानी होता. कारण का माहीत आहे?  कारण त्याने त्याच्या वडिलांचा मेंदू खाल्ला होता. त्याचे वडील राजा पंडु यानेच सहदेवाला तशी आज्ञा दिली होती. अल्पायुषी पंडू राजा या योजनेमुळेच बुद्धिरुपाने का होईनास्वतःच उरलेलं आयुष्य जगू शकला.
सोमवारपौष शुद्ध सप्तमी,
दुपार ४ वाजून १० मिनीटे
,
रमण सर अर्थातच परीक्षा उत्तीर्ण झाले. योगाने काटक बनवलेलं शरीर आणि सक्षम मन या मुळे ते सर्वथा योग्य उमेदवार ठरले होते. पंचक पुन्हा जमलं पण या वेळी शास्त्रींच्या लॅबमध्ये. किरणला ही पुन्हा बोलावण्यात आलं. यावेळी परीक्षा किरणची होती आणि त्या बिचाऱ्याला काहीच माहीत नव्हतं.
शास्त्री सर सरळ बोलायला सुरवात करतातवातावरण निर्मिती वगैरे त्यांना काही जमत नाही.  "हे बघ किरणरमण त्याचं सगळं ज्ञान देशाला समर्पित करतोय. आणि त्याचा ३०० पेटाबाईट चा ज्ञानसाठा उतरवून घ्यायचा म्हणजे कमीत कमी एक महिना लागेल मलाआणि पहिल्यांदाच जीवंत माणसावर प्रयोग करतोय."
"मेंदू फारच नाजूक पण कमालीचा जागृत. बॅकअप होताना त्याचा मेंदू अति ग्रहणशील अवस्थेत असेल. आणि तो पूर्वीसारखा स्वनियंत्रणात यायला अजून १५ दिवस ही घेऊ शकतो. त्यामुळे रमण च्या सांगण्या प्रमाणे तुला हा लाँच करायचा आहे"
"काय?" किरण ला आता काय करावंकाय बोलाव हेच सुचत नव्हतं. येत नाहीजमणार नाही असं म्हणण त्याला माहीत नव्हतं. पण उपग्रह लाँच करायचा आणि तो सुध्दा प्रत्यक्ष अनुभव नसतानाआणि वयाने दुप्पट असलेल्या शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञाना लीड करायचंयेऊन मला दीड महिने नाही झालेमला हे सिनीअर्स स्वीकारतील? माझ्या बरोबर काम करतील?
शास्त्री म्हणाले "ते सगळं तू माझ्यावर सोड. मी ते सगळं सांभाळून घेईन. मी बोलीन त्यांच्याशी". यांना काय मनातलं ऐकू येतं का?
"हे बघजास्त विचार करू नकोसपुढे ऐक." आता पुढे काय आणखीन ? "तू मनातल्या मनात बोलणं आधी बंद कर" शास्त्री जरा रागानेच म्हणाले. "रमण तुला लाँच ची महिती आधी काढून देतोयती तुझ्या मेंदूत ट्रान्सफर करायची आहे. यात कोणताही धोका नाही. दोन दिवसांच काम आहे. तोपर्यंत डेझी सांभाळेल."
"आहो मग डेझी मॅडम नाच का नाही सांगत. त्या आरामात हा लाँच करतील"
"हे बघरमण ने रेकॉर्डिंग सुरूही केलंय. त्यांनी जे आदेश तुझ्यासाठी द्यायला सांगितले होते ते मी तुला दिलेत. आता तू ठरवलाँच करायचा की कर्तव्यापासून पळून जायचं." ही किल्ली बरोबर लागली.
किरण ने निमुटपणे सहकार्य करायचं ठरवलं.
मंगळवारपौष शुद्ध अष्टमी,
सकाळ १० वाजून २५ मिनीटे
,
रीतसर फॉर्म भरून तो दिलेल्या बेडवर आडवा झाला. पुढचे दोन दिवस तो बेडला चिकटुन च होता. अर्धवट झोपेत अर्धवट जागेपणी. डोक्यात काहीतरी होत होतं पण कळत नव्हतं. मेंदू क्षणाक्षणाला अधिकाधिक जड होत होता. आणि अतींद्रिय शक्ती आपल्यात आल्या आहेत का असं किरण ला वाटायला लागलं - एकदम सुपरमॅन सारखं. डोळे बंद होते तरी किरणला सगळं दिसायला लागलं होतंअगदी भिंतीच्या पलीकडील घड्याळ पण!
पण किरण हुरळून गेला नाहीत्याला माहीत होतं की मेंदू माहिती मिळवण्यासाठी डोळ्यांवर 90% पर्यंत अवलंबून असतो. पण एकदा का माणसाने डोळ्यांबरोबर इतरही ज्ञानेंद्रीयांचा वापर तितक्याच प्रमाणात केला तर मेंदूची ज्ञानग्रहण करण्याची क्षमता २००% पटीपेक्षा जास्तही वाढवता येते. त्याच क्षमतावृद्धीचा अनुभव किरण घेत होता.
गुरूवारपौष शुद्ध दशमी,
रात्री १० वाजता
,
"कोणी मला डोकं उचलायला मदत करता का प्लिज" किरण झोपेतच बोलत होता. खूप अशक्तपणा जाणवत होता त्याला. "अरे किरण हे सगळं मानसिक आहे. स्वतःच्या मनाचा ताबा घे लवकर आणि आपल्या कामाला लाग. उद्या सकाळपासून तुला चार्ज घ्यायचाय. उठ लवकर." शास्त्रीसर जमजवत होते. "रात्रीचे दहा वाजलेत नापण मला चहा प्यावसा वाटतोय रवीच्या हातचा" रवी अजून झोपेतच होता. "हो सरमी मस्त चहा करून आणलाय. शास्त्री सरानी सांगितलंच होत मला" रवी च्या आवाजाने किरण ला पटकन जाग आली.
शुक्रवारमाघ कृष्ण अष्टमी,
दुपार ३ वाजून १० मिनिटे
रमण सरांनी किरणच्या खांद्यावरून हात काढला आणि रुममधली बेल दाबली. तेव्हा किरण भानावर आला. दीड महिन्यापूर्वी घडलेली ती घटना त्याच्या मनात अगदी ताजी होती.
बेल ऐकून आलेल्या वोर्डबॉयला डॉक्टर शास्त्रींच्या टीमला बोलवायला सांगितलं. आणि सगळ्यांसाठी चहा पाठवायला सांगितलं.
शास्त्रींची टीम आली. पण शास्त्री सर काही दिसले नाहीत. किरणचा चेहरा बघून, रमण सरांना राहवलं नाही. अरे, तुला पंचक दिसले का दोन दिवसातनाही नामाझ्यावरचा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यांनीही ठरल्याप्रमाणे आपलं वचन पुर्ण केलं.
शास्त्रींच्या टिमने किरण ला प्रक्रिये ची सखोल माहिती दिली. वापरली जाणारी उपकरणं आणि संगणक यांचं काम कसं चालतं शिवाय मनांत कोणत्या भावना प्रक्रिये दरम्यान येतात, याची ही त्याला पूर्वकल्पना दिली. पूर्वी जे प्रयोग केले ते प्राण्यांवर होते त्यामुळे त्यांना येवढी सविस्तर माहिती रमण सरांना देता आली नव्हती. पण मानवा वरचा पहिलाच प्रयोग येवढ्या निष्णात वैज्ञानिकावर केल्याने त्यांना सगळा रिपोर्ट आयता त्यांच्याच शास्त्रीय भाषेत आयता मिळाला.
किरण जरी फार तरूण असला तरी, शास्त्री सरांनी पूर्वी काढलेल्या अंदाजाप्रमाणे किरणचा बॅकअप घ्यायलाही महिना लागणार होता. किरण ने वाचलेल्या पुस्तकांचा साठा उतरवून घ्यायला तर चांगले १५० पेटाबाईट मेमरी लागणार होती. ही एवढ्या पुस्तकांची माहिती कोणाला लागणार सर अशी एक शंका कोणीतरी शास्त्री सरांना विचारली होती. त्यावर मिश्किलपणे शास्त्री सर म्हणाले होते तुझ्याच मेंदूमध्ये भरणार आहे मी ती
संध्याकाळी ५ वाजता
किरणने स्वतःला पूर्णपणे टकलू झालेलं कधीच बघीतलं नव्हतं अजून. त्याच्या मनाला व्यवस्थित शांत करून, किरणच्या डोक्यावर, मानेवर, मणक्यावर रिसेप्टर नोड्स चं जाळं चिकटवण्यात आलं. ह्या नोड्स ना संगणकाशी व्यवस्थित जोडून झाल्यावर हिप्नॉटिझम च्या सहाय्याने किरणचं अंतर्मन उघड करण्यात आलं. या अंतर्मनाशी संवाद साधत काही ठराविक प्रश्नांच्या सहाय्याने डॉक्टर्स मेंदूमधील माहितीसाठ्यापर्यंत पोहोचतात. आणि मनाने उत्तर तयार करण्यास सुरुवात केल्यावर संगणकाद्वारे मेंदूच्या रासायनिक आणि इलेक्ट्रीक संदेशांची, काँप्युटर च्या बायनरी कोड मध्ये परिवर्तन करून रेकॉर्डींग करण्यास सुरुवात होते.
ही शास्त्रींनी तयार केलेली प्रक्रिया जरी कितीही सोपी वाटली तरी ती फार किचकट आणि वेळ घेणारी होती. या प्रक्रियेचा मोठा फायदा म्हणजे कोणत्याही प्रकारे मेंदूवर शस्त्रक्रिया होत नाही आणि अगदीच कठीण प्रसंग आलाच तर सब्जेक्टला म्हणजे त्या व्यक्तीला संमोहनातून हळूहळू बाहेर काढता येते. असा ज्ञानसाठा संपूर्णपणे वैयक्तिक असतो – त्या त्या व्यक्तिच्या दृष्टीने त्याने बघितलेले जग आणि मिळवलेले ज्ञान याचा हा निर्मळ साठा असतो.
वाईट बाजू सांगायची झाल्यास, सब्जेक्टचे अंतर्मन उघडे असल्याने आणि मेंदू फारच सजग असल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या मनात प्रकट होणारा कोणता ही वाईट विचार ताबडतोब सब्जेक्टच्या मनात शिरू शकतो. आणि असले हे विचार काढून टाकणे हे फार किचकट काम आहे, त्याने सब्जेक्टच्या बद्धीचे फार दुरगामी नुकसान होऊ शकते.

आज,शुक्रवारमाघ कृष्ण द्वादशी,
सकाळ  वाजून १० मिनिटे
रमण सरांच्या कॅबीन मध्ये प्रचंड गर्दी उसळली आहे. इस्रो चे लोकांची गर्दी आहेच पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रकार मुलाखती साठी आले आहेत. प्रत्येकाला मुलाखत देण्यापेक्षा आता पत्रकार परिषद घेणे संयुक्तिक होईल म्हणून तशी व्यवस्था लावण्यात कम्युनिकेशन टिम व्यस्त आहे.
पत्रकारांना आपण कोणते प्रश्न विचारणार आहोत त्याची यादी करण्यास सांगितले आहे. त्यांची चहा आणि नाश्ताची सोय लावून, रवी यादी गोळा करण्यात व्यस्त आहे. काही त्रासिक ठरतील असे प्रश्न दिसल्यास हे प्रश्न विचाराचे नाहीत अशी सुचना तो सगळ्यांना करतो आहे.
डेझी मॅडम आंतरराष्ट्रीय पत्रकारांशी चर्चा करत आहेत आणि त्यांनी तयार केलेल्या यादीतील प्रश्न समजून घेत आहेत.
काही पत्रकार संवेदनशील प्रश्न विचारण्यासाठी फार कुप्रसिद्ध आहेत त्यांना देशाच्या अंतराळ प्रयोगाची आणि इस्रो ची भुमिका समजावून देण्यात काही शास्त्रज्ञ व्यस्त आहेत. बरोबर दुपारी १२ वाजता परिषद सुरु होईल आणि ती जास्तीत जास्त दोन तास चालेल अशी उद्घोषणा करण्यात येत आहे.
दुपार, १ वाजून ३० मिनीटे
परिषद चांगली चालली आहे. सगळे उत्तम रितीने सहकार्य करत आहेत. प्रश्नांची तयारी झालेली असल्यामुळे उत्तरे ही समाधानकारक मिळत आहेत.
भारतीय अवकाश कार्यक्रमाचे मुख्य ओळख असलेले डॉ रमण लाँच च्या दोन महिने आधी ठणठणीत असलेलेएकाएकी येवढे अत्यवस्थ कसे झालेत्यांचे सहकारी डॉ किरण यांनी फारसा अनुभव नसताना स्वतः ही जबाबदारी एकट्याने कशी पार पाडली
याप्रश्नावर डेझी मॅडमनी फार समर्पक उत्तर दिले डॉ. रमण एक खूप चांगले लीडर आहेतत्यांनी 
दुसऱ्या फळीचे संशोधक आणि लीडर्स चांगले तयार केले आहेत. आणि आजारी पडण्याबद्दल म्हणाल तर त्यावर कोणाचं नियंत्रण. रमण सर धडधाकट परत आले यातच आम्हाला आनंद आहे.
डॉ किरण कसे आजारी पडले मग?” यावर ही, खूप ताण आला त्यांच्यावर, म्हणून असेल कदाचित
 एरव्ही पैसा पैसा वाचवणाऱ्या भारताने यावेळी एकच उपग्रह कसा काय सोडला या परदेशी पत्रकाराच्या प्रश्नावर डॉ रमण म्हणाले तुम्हाला तर माहीतच आहे मागच्या भाद्रपद म्हणजे तुमच्या मागच्या वर्षीच्या कॅलेंडर प्रमाणे ऑगस्ट मध्ये आम्ही एक शोधयान धूमकेतूच्या मागे सोडले होते. ते यान आता धूमकेतूवर उतरण्याची वेळ जवळ आली आहे. त्या यानातून येणारे संदेश ताबडतोब मिळावेत म्हणून हा उपग्रह आम्ही पृथ्वीच्या सर्वात वरच्या कक्षेत बसवला आहे. तो उपग्रह खूप जड आहे म्हणून एकटाच सोडावा लागला त्याला 
येवढ्यात काही कळते न कळते तोच, वातावरण तंग करणारा प्रश्न आलाच...
काही वेगळं शिजतय कासगळं काही तुम्ही सांगता येवढं सोपं वाटत नाही. तुम्ही आजारी झालात, त्यानंतर प्रसिद्ध बायो टेकनॉलॉजिस्ट शास्त्री आजारी पडले आणि इतरही काही नामांकीत व्यक्तीही आजारी पडलेत.
आम्ही ऐकल्याप्रमाणे नासा तुमच्या या उपग्रहावर खूप संदिग्ध मनस्थितीत आहे कारण तुम्ही उपग्रहाला एक कॅप्स्युल जोडली आहे आणि त्यात एक माणूस सदृश्य पुतळा बसवलायहे करायला मिळवं म्हणूनच का तुम्ही एकुलता एक उपग्रह सोडलात का.
आता हे प्रश्न कोणालाही घाबरवून टाकायला पुरेसे आहेत पण रमण सर याही प्रश्नांना बगल देऊ शकतात. हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ते चारही जण एकत्रच आजारी पडलेत हे खरं आहे. ते सगळे माझे मित्रच असल्यामुळे मला थोडीशी कल्पना ही आहे की ते कश्यामुळे आजारी पडले असतील.  कुठल्यातरी मिडियाच्या कार्यक्रमात ते गेले होते आणि त्यांच्या खाण्यात काही तरी चुकीचं आलं असावं असा डॉक्टरांचा कयास आहे. पोलिसांचा तपास चालू आहे. पूर्ण झाला की कळेलच असं सांगून त्यांनी डाव उलटवला.
आता त्या पुतळ्याबद्दल विचाराल तर आता बऱ्याच आंतरराष्ट्रीय अंतराळ शोधकार्य करणाऱ्या व्यापारी संघटना काही ना काही प्रकारचे वेगवेगळे गिमिक्स करताहेतच. तश्याच एका भारतीय संघटनेने आम्हाला दिलेला हा पुतळा आहे. त्याची जाहिरात व्हावी म्हणून आम्हीही एका कॅप्स्युलमध्ये घालून त्याला उपग्रहाला जोडला. घाबरू नका, यात काही वेडवाकड शिजत नाहीये

दुपार,  वाजून ३० मिनीटे
सगळे पत्रकार आणि बाहेरचे लोग गेलेले आहेत. पण  रमण सरांजवळ गर्दी आहेच. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे. शास्त्रज्ञांचं समाधान या अश्या उत्तरांनी होणार नव्हतं.

रमण सर सगळ्यांकडे बघून एकच वाक्य म्हणाले माझ्यावर विश्वास ठेवा. आपण फार मोठ्या शोधांच्या उंबरठ्यावर उभे आहोत. लवकरच भारताच्या अंतराळयुगाचा आणि भारतीय विज्ञानाचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. आपण सगळे एक होऊन हे यश खेचून आणूया. चला नवीन भारत बनवूया. वंदे मातरम्
आणि वंदे मातरम् च्या जयघोषाने इस्रोचं आकाश दुमदुमून गेलं.

अदलाबदल

गुरुवार ,  माघ कृष्ण सप्तमी , पहाटे ३ वाजून १४ मिनिटे लाँच व्यवस्थित झाला आणि उपग्रह ठरवून दिलेल्या कक्षेत आपल्या कामाला लागला. कंट्रोल ...